जळगावकरांनो सावधान : आज पासून हेल्मेट सक्तीचे, नाहीतर भराव लागेल हजार रुपयांचा दंड
जळगावकरांनो सावधान : आजपासून हेल्मेट सक्तीचे, नाहीतर भराव लागेल हजार रुपयांचा दंड

चार वर्षांवरील प्रत्येकाने महामार्गावर हेल्मेट परिधान करणे अनिवार्य
जळगाव टाइम्स नितीन ठाकूर I राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी अपघातांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शासनाने अपघातात होणाऱ्या मृत्यूंचा आणि गंभीर जखमा टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोमवार, ३ फेब्रुवारीपासून वाहतूक नियंत्रण विभागाने राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती लागू केली आहे.
या सक्तीचा परिणाम दुचाकी चालकांसोबतच त्यांच्या मागे बसलेल्या व्यक्तींवरही होणार आहे. म्हणजेच, राष्ट्रीय महामार्गावर जाणाऱ्या प्रत्येक दुचाकीवरील चालक व त्याच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट परिधान करणे बंधनकारक असेल. याशिवाय, चार वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला महामार्गावर हेल्मेट घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. हेल्मेट न घातल्यास एक हजार रुपयांचा दंड लागू करण्यात येईल.शहरात हेल्मेट सक्ती नसली तरी शहरातून जाणाऱ्या महामार्गावर आणि महामार्गावरील चौकांमध्ये हेल्मेट घालणे अनिवार्य असेल. नियम उल्लंघन करणाऱ्या दुचाकी चालकांना पोलिसांनी दंड आकारण्यात येईल.
याआधी, शासनाने १ जानेवारी २०२५ पासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्याचा आदेश दिला होता, परंतु आता हा नियम दुचाकीवरील चालक व मागे बसणाऱ्या दोघांसाठी लागू होणार आहे.वाहतूक नियंत्रण विभागाने ठिकठिकाणी चाहतूक पोलिस तैनात करण्याची योजना तयार केली आहे, जे थेट दंडात्मक कारवाई करणार आहेत. वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली.
हेल्मेट घालणे हे सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि या निर्णयामुळे राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या कमी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.