Chalisgaon News : नागद रोडवरील झोपडपट्टीत भीषण आग, चार घरे खाक, जीवितहानी टळली
Chalisgaon News : नागद रोडवरील झोपडपट्टीत भीषण आग, चार घरे खाक, जीवितहानी टळली

जळगाव टाइम्स प्रतिनिधी| जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील नागद रोड परिसरातील झोपडपट्टीत तीन ते चार घरांना आग लागल्याची घटना आज, शुक्रवारी घडली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र नागरिकांच्या संसार उपयोगी वस्तू, पैसे व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
चाळीसगाव शहरातील नागद रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोर असलेल्या झोपडपट्टीमध्ये ही आग लागली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, मात्र स्थानिक नागरिकांच्या मते शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली. काही नागरिकांनी महावितरणच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याचा आरोप केला आहे.
आगीची माहिती मिळताच, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील फायर टीमने युद्धपातळीवर काम करत दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या भीषण आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नागरिकांचे अश्रू अनावर, प्रशासनाकडून पंचनामा सुरू
घरांसह संपूर्ण संसार जळून खाक झाल्यामुळे नागरिकांना अश्रू अनावर झाले. या घटनेची गंभीर दखल घेत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी पाहणी केली. सध्या प्रशासनाकडून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.