राजकीय

पालकमंत्री पदाचा तिढा सुटेना बीड ,जळगाव, आणि रायगड साठी अडलय घोड?

पालकमंत्री

जळगाव टाइम्स नितीन ठाकूर

जळगाव :- राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर एकूण ४२ मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यांना खातेवाटपदेखील झाले. मात्र आता महत्वाचे म्हणजे पालकमंत्रीपदाची निवड खातेवाटप होऊन २ आठवडे सरत आले तरीही जाहीर झालेली नाही. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील महत्वाच्या कामांना खीळ बसला आहे. महायुतीतील अंतर्गत वृत्तानुसार, बीड, जळगाव, रायगडवरून पालकमंत्रीपदाचे गाडे अडले असल्याची माहिती मिळाली आहे.

जिल्ह्याच्या विकासावर देखरेख ठेवण्यासाठी पालकमंत्री नियुक्त केला जातो. पालकमंत्री जिल्ह्यातील विविध राज्य सरकारच्या योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवतात आणि जिल्ह्याचे प्रशासन कार्यक्षमतेने कार्यरत असल्याची खात्री करतात. जिल्ह्यातील ३ मतदारसंघातील आमदार हे राज्यात विविध खात्याचे मंत्री आहेत. त्यात मागील मंत्रिमंडळातील गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांच्यासह यंदा प्रथमच कॅबिनेट मंत्री झालेले संजय सावकारे असे ३ मंत्री आहेत.

जळगाव जिल्ह्यासाठी मागीलप्रमाणे गुलाबराव पाटील हे पालकमंत्रीपदाचे पक्के दावेदार आहेत. मात्र भाजपचे संकटमोचक नेते गिरीश महाजन यांनीही यंदा जळगाव व नाशिककरिता दावा केला असून हा तिढा अजून सुटलेला नाही अशी माहिती मिळाली आहे. दुसरीकडे संजय सावकारे यांना नंदुरबार जिल्ह्याचे पालकपद मिळण्याची दाट शक्यता असून त्यासाठी त्यांनी तयारी दर्शविल्याचे महायुतीच्या गोटातून कळाले आहे. तर बीडमधील सरपंच हत्येप्रकरणामुळे स्थानिक जिल्ह्यातील असूनही मुंडे भाऊ-बहिणींना पालकमंत्रिपद मिळण्यात आता सत्ताधाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे बीडला पालकपद हे दोन्ही उपमुख्यमंत्री अजीत पवार किंवा एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याबाबत विचार आहे.

तसेच, रायगड जिल्ह्यात मागील वेळेला मंत्री अदिती तटकरे या पालकमंत्री होत्या. यंदा शिंदे गटाचे भरत गोगावले हे कॅबिनेट मंत्री झाले आहे. त्यांनी पालकमंत्रीपदावरील दावा अद्याप सोडलेला नाही. ये तिघा जिल्ह्यांचा झालेला पेच हा अद्यापही, काही दिवसांपूर्वी ‘२ दिवसात पालकमंत्री पदाची यादी जाहीर करू’ म्हणणारे कणखर मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस सोडवू शकलेले नाही.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button