माहेजीदेवीचा यात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात
माहेजीदेवीचा यात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात

जळगाव टाइम्स | प्रतिनिधी| पाचोरा तालुक्यातील माहेजीदेवीचा यात्रोत्सव १३ जानेवारी पौष पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तापासून सुरू होण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. १३ जानेवारीपासून या यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहाने सुरुवात होत आहे.
गिरणा नदीच्या काठावर वसलेले माहेजीदेवी तीर्थक्षेत्र हे नांद्र्यापासून पाच कि. मी. अंतरावर आहे. माहेजीदेवीचा यात्रोत्सव हा खान्देशातील सर्व यात्रोत्सवात प्रसिद्ध यात्रोत्सव आहे. ब्रिटिश काळापासून सुरू झालेला हा यात्रोत्सव १५ दिवस चालतो. या माहेजीदेवी तीर्थक्षेत्र विकास निधीतून नवीन मंदिर, भव्यदिव्य सभामंडप, पाण्याची टाकी, काँक्रिटीकरण, कळसारोहण कार्यक्रम असे विविध प्रकारचे काम तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमातून करण्यात आले आहे. या यात्रोत्सवात पूजेची, प्रसादाची दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची मोठमोठी दुकाने, त्यात भांडी, खेळणी, हॉटेल, रसवंती. पाळणे, संसारोपयोगी वस्तू, फोटो स्टुडिओ, लोकनाट्य तमाशा मंडळ अशी विविधता असलेल्या यात्रेत भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.
बैलगाडी व ट्रॅक्टर, मोटारसायकलवरून भाविक मोठ्या प्रमाणात यात्रोत्सवाला दाखल होतात. या यात्रोत्सवाला पाचोरा पोलीस बंदोबस्त ठेवतात. पाचोरा व एरंडोल आगारातून जादा बसेसची व्यवस्था केली जाते
यात्रोत्सवादरम्यान ग्रामपंचायत माहेजीमार्फत यात्रेची सर्व व्यवस्था केली जाते.पालखी सोहळा वरसाडे येथील माहेजीदेवीच्या लहान मंदिरापासून १२ रोजी सकाळी ५ ते ११ वाजेपर्यंत संपूर्ण गावात पादुकांचा पालखी सोहळा व मुख्य आकर्षण म्हणजे नावाजलेल्या बॅण्ड पथकांची हजेरी. माहेजी येथील मुख्य माहेजीदेवीच्या मंदिराच्या पादुकांचा भव्य पालखी सोहळा पौर्णिमेला १३ रोजी सकाळी ५ ते ११ वाजेपर्यंत व पादुका पूजनाचा कार्यक्रम हा नामांकित बॅण्ड पथक व भजनी मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण गावातून शोभायात्रा काढण्यात येते. आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते सपत्नीक पादुका पूजन होईल. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर असते. या वर्षी बापू भगत, अन्ना भगत व दत्तू भगत यांच्याकडे देवीच्या पूजाअर्चेचा मान आहे.