वाळू माफियांची दादागिरी कायम : पाचोरा तालुक्यात ट्रॅक्टर पकडल्याच्या वादातून महसूल कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की
वाळू माफियांची दादागिरी कायम : पाचोरा तालुक्यात ट्रॅक्टर पकडल्याच्या वादातून महसूल कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की

जळगाव टाइम्स| प्रतिनिधी| : पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खुर्द येथे अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडल्याने वाळू माफियांनी वाद घालत महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. पथकातील तलाठ्याला एकाने ट्रॅक्टरवरून खाली ओढले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच चार जणांना अटक करण्यात आली. दरम्यान, वाळू माफियांची दादागिरी जिल्ह्यात थांबायला तयार नसल्याचे चित्र यातून पुन्हा समोर आले आहे.
राज पाटील, दुर्गेश ऊर्फ नानू पाटील, विवेक ऊर्फ भावड्या पाटील, हिरालाल पाटील (सर्व रा. अंतुर्ली, खुर्द, ता.पाचोरा) अशी अटक करण्यात आलेल्या वाळू माफियांची नावे आहेत. अंतुर्ली खुर्द येथे अवैध वाळूचा साठा करण्यात आल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली होती. महसूल विभागातील चार जणांचे पथक या गावात पोहचले. त्यात निपाणे तलाठी तात्याराव सपकाळ, बाळद बुद्रुकचे तलाठी अतुल पाटील, पुनगावचे तलाठी तेजस बहहाटे आणि पाचोरा तलाठी गंगाधर सुरनर यांचा समावेश होता.
पथक पोहचले त्यावेळी एक ट्रॅक्टर गिरणा नदी पात्रातून येताना दिसले. पथकाने हे वाहन थांबवले असता, वाळू माफियांनी पथकाला मारहाण केली. तलाठी अतुल पाटील ट्रॅक्टरवर चढले असता त्यांना खाली ओढत वाळू माफियांनी ट्रॅक्टर पळवून नेले. 64 हजार रुपयांची अवैध वाळू जप्त करण्यात आली.